बुलडाणा - तालुक्यात गिरडा गावातील एका किराणा दुकानात मोठे अस्वल घुसल्याने संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडाली होती. या अस्वलाने एक तास ठिय्या दिला होता. अस्वलाने दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
किराणा दुकानात घुसले अस्वल... बुलडाणा शहराच्या चारही बाजूने अभयारण्य असल्याने या अभयारण्यातील हिंसक प्राणी जवळच्या गावांमध्ये अनेक वेळा घुसतात. यामुळे अभयारण्यालगतच्या गावकऱ्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. आज (शुक्रवारी) सकाळी गिरडा गावात अस्वल घुसल्याने एकच गोंधळ उडाला होता. हे अस्वल फक्त गावातच घुसले नाही, तर त्याने एका किराणा दुकानाचा ताबा घेतला. एक तास दुकानात बसून किराणा दुकानातील तेलावर ताव मारत दुकानातील सामानाची नासधूस केली. अस्वल दुकानातून बाहेर पडत असताना एका महिलेचे लक्ष अस्वलावर पडले. नंतर त्या महिलेने आरडाओरडा केला. अस्वलाने एका झुडपाचा आसरा घेतला. अस्वलाला पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या अस्वलाने तिथून पोबारा केला. अनावधानाने या अस्वलाने कुणावरही हल्ला केला नाही. या घटनेने गिरडावासी भयभीत झाले आहेत. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन परिक्षेत्र अधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी यांनी गिरडा गावामध्ये अस्वलाने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे. गावाला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. दुकानदाराला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गिरडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.