बुलडाणा - कोरोना लॉकडाऊन काळात गरोदर मातांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पाच महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत गरोदर मातांमध्ये यावर्षी एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
कोरोना महामारीपासून बचावासाठी शासनाने मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात केली. ऑगस्टपर्यंत राज्यात व बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान गरोदर मातांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात 20 हजार 498 गरोदर महिलांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 20 हजार 282 गरोदर महिलांची नोंद करण्यात आली होती. तर याच पाच महिन्यांच्या काळात 10 हजार 272 महिलांची प्रसूती झाली आहे.