बुलडाणा -देऊळघाट पाठोपाठ ग्राम करवंड येथे पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर खेळणाऱ्या 4 मुलांवर हल्ला केला आहे. यात चारही मुले जखमी झाली आहेत. ही घटना काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. जखमी मुलांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -बुलडाणा नगराध्यक्षा यांचे पती व लेखापाल मध्ये हमरीतुमरी
देऊळघाट नंतर करवंडमध्ये कुत्र्याचा हल्ला
बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. सोमवारी बुलडाण्यापासून जवळच असलेल्या देऊळघाट येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 बालकांना जखमी केले होते. यातील जख्मी बालकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करवंड येथे दिसून आली. येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 मुलांना चावा घेतला. करवंड येथील निशा सागर गवई (वय 5), शेख असद शेख अन्वर (वय 9), पूर्वा सुनील फाटे (वय 11) व कार्तिक समाधान तारगे (वय 6) अशी जखमी मुलांची नावे आहेत. चारही मुलांना तत्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रागाच्या भरात ग्रामस्थांनी पिसाळलेल्या कुत्र्याला केले ठार
या घटनेनंतर राग आलेल्या करवंड गावातील नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले. शहरासह ग्रामपातळीवर वाढत असलेले पिसाळलेल्या कुत्र्यांची हल्ले थांबवून या कुत्र्यांचा कायम बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा -खामगाव एमआयडीसी परिसरातून ८५ किलो गांजा जप्त; ३ आरोपी ताब्यात.