बुलडाणा - सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे समृद्धी महामार्गावर टिप्परच्या अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी किनगांवराजा पोलिसांनी टिपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याला अटक केली. तर मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टिप्पर चालक व कामगार कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार युवराज रबडे यांनी दिली आहे. दरम्यान, यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (विवेक बगीश रॉय, वय 27 वर्ष,) रा. धनेश चपरा बिहार असे टिप्पर चालकाचे नाव आहे. ज्ञानेद्र लक्ष्मी नारायण गोर पटेल रा. देवरीगंज मध्यप्रदेश असे कामगार कंत्राटदाराचे नाव आहे.
'टिप्परचा आणि चालकाचा परवाना निलंबित'
समृद्धी महामार्गाचे काम हे जवळपास 70 टक्के पूर्णत्वास गेले असून, सिंदखेड राजा तालुक्यातील पॅकेज क्रमांक सात मधील बांधकाम सहाय्यक कंत्राटदार रोडवेज सोल्यूशन इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. त्या कामावर मध्य प्रदेशातील मजूर कार्यरत होते. सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे 20 ऑगस्ट रोजी हे मजूर पावसामुळे काम बंद पडल्याने टिप्परमध्ये अवैधरित्या बसून आणले गेले. एका वाहनाला साईट देताना टिप्पर पलटी होऊन यामधील लोखंडी सळईखाली दबून यातील 13 मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये टिप्पर चालक विवेक बगीश रॉय यांचा आणि मालवाहू टिप्परचा 6 महिन्यांसाठी परवानाही निलंबित करण्यात आला आहे.