बुलडाणा- पावसामुळे यावर्षी राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यात नुकसानाची सारखीच परिस्थिती आहे. राज्याच्या कोणत्याच भागातील शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी उत्पन्न आले नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहुन आधार देण्याची गरज असताना राजकीय व्यवस्था सत्ता स्थापनेच्या गोंधळात तर प्रशासन आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणत्याही अटी न लादता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख अनुदानाची मागणी केली. जर 4 दिवसांत निर्णय न घेतल्यास ११ नोव्हेंबर सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र भुयार यांनी आज बुलडाण्यातून केली.
विदर्भातील 'स्वाभिमानी'चे पहिले आमदार देवेंद्र भुयार यांनी ५ नोव्हेंबरला स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, राणा चंदन यांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाने खरीप हंगामातील सर्व पिके उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. शासनाने कोणत्याही अटी न लादता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे, अशी माहिती यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली.
हेही वाचा - लोणार तालुक्यात नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले
त्यासाठी राजू शेट्टी, आमदार भुयार यांच्यासह मंत्रालयात कृषी सचिव डवले यांची भेट घेतली. पीकविमा संदर्भातील जाचक अटी दूर करण्याचीही मागणी त्यांच्याकडे केल्याचे तुपकरांनी सांगितले. आ. भुयार यांनी यावेळी बोलताना सांगितले, की कॉर्पोरेट कंपन्याचे कर्ज जसे मोठ्या मनाने माफ केले जाते त्याच पद्धतीने आता सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांना भरघोस मदत देणे आवश्यक आहे. पीकविम्यासाठी कंपन्यांनी स्वतंत्रपणे सर्व्हे न करता महसूल आणि कृषी विभागाने केलेले पंचनामे अंतिम मानून नुकसान भरपाई देण्याच गरज आहे. नुकसानभरपाईच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.