बुलडाणा - देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा विळखा राज्यालाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांसाठी देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे. सध्या डाॅक्टर, पोलीस यंत्रणा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने घर मालकांनी त्यांच्या येथे भाड्याने राहणाऱ्या डाॅक्टरांना घर रिकामे करा, असे सांगितले असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यातील खामगाव येथे घडला आहे.
हेही वाचा...जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेत डॉक्टरांचा समावेश होतो. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, असे असताना कदाचित डॉक्टरांमुळे किंवा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला देखील कोरोना होईल, या धास्तीने डाॅक्टरांना किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ते राहत असलेले भाड्याचे घर रिकामे करण्यास सांगितले जात आहे.