बुलडाणा- जिल्ह्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. तसेच, सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाने तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पीकविमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांनी १०० टक्के मदत मिळवून द्यावी. असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिंगणे यांनी हे आदेश दिले. पालकमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, अर्थात एनडीआरएफमध्ये पिकाचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास जिरायत शेतीसाठी प्रती हेक्टरी ६ हजार ८०० व बागायती शेतीसाठी १३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे, फळपिकांकरीता प्रती हेक्टर १८ हजार रुपयांची आर्थिक मदत निकषानुसार देण्यात येते. जिल्ह्यात कृषी विभागाच्या सर्व्हेनुसार अतिवृष्टीमुळे ३८ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना २५ कोटी ९५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आदेश पालकमंत्री शिंगणे यांनी दिले.
मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप पिकांसाठी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ज्या संबंधित पीकविमा कंपनी, तसेच कृषी विभागाच्या कार्यालयाला कळवले आहे, अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ सर्व्हे करून पंचनामे पूर्ण करावे. त्यांना संबंधित पीकविमा कंपनीने विम्यापोटी देण्यात येणारा आर्थिक परतावा १०० टक्के द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री शिंगणे यांनी दिल्या.
त्याचबरोबर, प्रत्येक बँकेने त्यांच्याकडील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ कर्जवाटप करावे. सर्व बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाएवढे पात्र शेतकरी उपलब्ध नसल्याचे आढावा सभेमध्ये सांगितले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या, मात्र कर्जवाटप होऊ न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी बँक/शाखा निहाय जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयास पाठवली आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित व्यापारी, ग्रामीण बँकांनी तातडीने कर्जवाटप करावे व नियमित अहवाल सादर करावा. असे आदेशही शिंगणे यांनी दिले. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, रिलायन्स पीकविमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
हेही वाचा-अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल