संग्रामपूर (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यात शनिवारी 27 जून रोजी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल 13 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या मुसळधार पावसाचा अनेक गावांना फटका बसला आहे.
वानखेड, पातुर्डा, वरवट बकाल, बावनबीर या परिसरात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे वाण नदीसह परिसरातील लहान ओढे आणि इतर नाल्यांना पूर आला. यामुळे अनेक गावातील विजेचा पुरवठा खंडित झाला. तर वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
हेही वाचा...आसाममध्ये पुराचा कहर.. २५ हजार नागरिकांना फटका, रंजन गोगाईंच्या घरात शिरले पाणी
शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, पातुर्डा, वरवट बकाल, बावनबीर या परिसरात तर जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे शेकडो हेकटरवरील पेरणीचे नुकसान झाले. तर नदीकाठावरील शेतातील सुपीक माती पाण्यासोबत गेली. तसेच अनेक शेतात पाणी साचले असल्याने शेत-शिवारांना तलावाचे स्वरूप आले आहे. त्यासोबत वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ येथील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.
बावनबीर परिसरात सरासरी 85 मिलिमीटर, पातूर्डा 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून संग्रामपुर परिसरात सरासरी 64 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांचेही नुकसान झाले. तर वरवट बकाल येथील बाजार समितीमध्ये ठेवलेले धान्य आणि इतर चीजवस्तू पाण्याने भिजले आहे.