बुलडाणा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने रस्त्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झाली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
धरणाच्या पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ :सततच्या मुसळधार पावसामुळे केदार नदीला पूर आला असून पुराचे पाणी गावात शिरले आहे. बावनबीर ते टुनकी हा रस्ता पुरामुळे बंद झाला आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरले असून शेतांचे नुकसान झाले आहे. सर्वत्र पाऊस पडत असल्याने तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी वैरागड येथील हनुमान मंदिर सागर धरणात पाण्याची आवक वाढत आहे. आठवडाभरात धरणाच्या पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली. 15 जुलै रोजी हनुमान सागर जलाशयाची पातळी 395.72 मीटर इतकी होती. त्यावेळी धरणात 33.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर धरण पाणलोट क्षेत्रात 149 मीटर पावसाची नोंद झाली आहे.
गावे पुराच्या पाण्याने वेढली :सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांमध्ये सकाळी जोरदार पाऊस झाला. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांची घरेही पाण्याखाली गेली. संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथे नदीच्या पुरात जवळपास 100 घरे पाण्याखाली गेली आहेत. संग्रामपूर शहर, तालुक्यातील भवानबीर वरवट बकाल वानखेड काथरगाव ही गावे पुराच्या पाण्याने वेढली असून संग्रामपूर शहर देखील पुराच्या पाण्याने व्यापले आहे. नजीकच्या तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली आहेत. शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद महामार्ग, जळगाव जामोद, नांदुरा महामार्ग बंद झाल्याने या दोन तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.
शेतीचे मोठे नुकसान :आज संग्रामपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, नवीन लागवड केलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक शेततळी वाहून गेली आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सुटणार आहे.
हेही वाचा -Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात