बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीचे ( Shegaon Panchayat Samiti ) गटशिक्षणाधिकारी यांना कार्यालयीन व्हॉट्सॲप गृपवर एका महिलेबद्दल अश्लील मेसेज ( Obscene Messages On WhatsApp ) टाकणे चांगलेच भोवले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका आदेशाने शेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रकाश केवट ( Prakash Kevat Suspended ) असे आहे.
असा आहे प्रकार
शेगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारीपदाचा प्रभार पहुरजिरा येथील केंद्रप्रमुख प्रकाश केवट यांच्याकडे होता. यावेळी पंचायत समिती अंतर्गत कार्यालयीन कामकाज असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी एका महिलेबद्दल अश्लील मॅसेज टाकला होता. त्यामुळे गृपमध्ये असलेल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापकांची कुचंबणा झाली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानेच मेसेज टाकल्याने अनेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काहींनी केवट यांना माहितीही दिली होती की, आपल्याकडून व्हॉट्सॲप गृपमध्ये अश्लील मेसेज टाकण्यात आला आहे, तो डिलीट करावा. मात्र डिलिट करण्याऐवजी ( Delete For Everyone ) त्यांनी ग्रुप सोडला. त्यांना मॅसेज डिलीट करता आला नाही, त्यामुळे तो मेसेज तसाच राहिला.