बुलडाणा - जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मलकापूर पांग्रा येथे विद्युतखांबावर वीज जोडणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा वीज खांबावरच शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी १६ मार्चला सकाळी घडली. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे विश्वंभर श्रावन मांजरे असे नाव आहे. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी गावात धाव घेत परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले. या घटनेला जबाबदार असणारे वीज तंत्रज्ञ अशोक देशमुख यांना तातडीने अटक करण्यात आली.
वीज जोडणीसाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शॉक लागून म़ृत्यू,जबाबदार वीज तंत्रज्ञाला अटक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने झाला मृत्यू -
मलकापूर पांग्रा येथे काल सोमवारी रात्रीपासून गावाचा कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजवितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत अशोक देशमुख यांनी ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावन मांजरे यांना अकिल ठेकेदार यांच्या शेतातील खांबावर वीज जोडण्यासाठी पाठवले. मात्र, वीज जोडणी करत असतानाच विज पुरवठासुरू झाला. यामुळे शॉक लागुन विश्वंभर मांजरे यांचा खांबावरच मृत्यू झाला.
वीज तंत्रज्ञ अशोक देशमुख यास केले तातडीने अटक -
शॉक लागुन विश्वंभर मांजरे यांचा खांबावरच मृत्यू झाल्याच्या घटना घडताच विज तंत्रज्ञ प्रशांत अशोक देशमुख हा फरार झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी संतप्त होत तंत्रज्ञ देशमुख व हेल्पर सोनपसारे यास तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे, दुय्यम ठाणेदार दीपक राणे, जमादार नारायण गीते, बिबीचे ठाणेदार एल. डी. तावरे यांनी गावात धाव घेत संतप्त नागरिकांची समजूत घालत वातावरण शांत केले. ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी या घटनेला जबाबदार धरत वीज तंत्रज्ञ अशोक देशमुख याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार दीपक राणे हे करत आहेत.
क्रॉसिंग झाल्याने ही घटना घडली -
मृत विश्वंभर मांजरे हे विज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव खांबावर काम करण्यास गेले होते. घटनास्थळी मी हजर नव्हतो. मलाफोनवर लोडशेडिंग बद्दल विचारणा करण्यात आली होती. त्या ठिकाणी लोडशेडिंग होते. मात्र, क्रॉसिंग झाल्याने ही घटना घडली. अशी माहीती वीज तंत्रज्ञ प्रशांत देशमुख यांनी दिली.
विश्वंभर ठरला हलगर्जीपणाचा बळी -
जीर्ण झालेल्या तारा आणि इन्सुलेटर मुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे. साहेबगीरीच्या तोऱ्यात वावरणारे लाईनमन अजिबातखांबावर चढत नाहीत. परमीट न घेता हॅण्डट्रीप घेऊन खासगी मजूराव्दारे परस्पर काम करून घेतात. त्यामुळे हा विज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा बळी असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. सबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकरी व शेतकरी करत आहेत.