बुलडाणा - हाथरस असो की कोपर्डी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी समाजमन बधीर होत आहे. आता बुलडाणा जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथे 21 वर्षीय गतीमंद तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी 14 नोव्हेंबरच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घडली. आई व भावाच्या तक्रारीवरून तामगांव पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
आईने गावातील नळावर पाठविले असता घडला प्रकार -
काकणवाडा येथील 21 वर्षीय तरुणी जन्मापासूनच गतीमंद असल्याने तिचे लग्न होवू शकले नाही. या मुलीचे पित्याचे छत्र हरविल्याने आईने तिचा सांभाळ केला. शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान तिच्या आईने तिला गावातील विठ्ठल कुरवाळे यांच्या घरासमोरील नळावर पाठविले.
बराचवेळ होवूनही आपली मुलगी परत का आली नाही, हे पाहण्यासाठी आई नळावर गेली. तर तिला बाजूलाच कुरवाळे यांनी बांधलेल्या शौचालयातून मुलीचा आवाज आला. त्या शौचालयात जावून पाहिले असता सोपान गजानन रसाळे हा त्या मुक्या आणि गतीमंद तरुणीवर अत्याचार करताना दिसून आला.