बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने मंदिरांसह धार्मिकस्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शासनाने निर्देशित केलेले उपाय व मार्गदर्शक सूचनांनुसार 7 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. नागरिकांना ई-पास द्वारे श्रींचे दर्शन घ्यावे लागणार आहे. मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये तसेच दर्शनासाठी येत असतांना शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून धार्मिकस्थळं होणार सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेली धार्मिकस्थळे येत्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(24 सप्टेंबर) जाहीर केला. दरम्यान, आरोग्याच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पहिली लाट ओसरत असतानाच दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना सोसावा लागला. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचा इशारा टास्ट फोर्सने दिला. तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र, हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल केले आहेत. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे उघडण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.