बुलडाणा - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या दिव्यांग वारसाला तब्बल 15 वर्षांपासून स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेतून पेंशन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
दिव्यांग नातेवाईकावर उपासमारीची वेळ -
बुलडाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांची दिव्यांग मुलगी पुष्पा राऊत व मुलगा पुरुषोत्तम राऊत यांचा स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेतून पेंशन मिळविण्यासाठी 15 वर्षांपासून केंद्र व राज्यसरकारसोबत संघर्ष सुरू आहे. मात्र, शासनदरबारी त्यांच्या या मागणीकडे कुणीही लक्ष देत नसल्याने पुष्पा राऊत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे पुरुषोत्तम राऊत यांनी सांगितले.
असा सुरू आहे संघर्ष
स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजना, 1980 अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या एकाच पात्र व्यक्तीस पेंशन देण्याची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यातील आसलगाव येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक त्र्यंबक सोनाजी राऊत यांची दिव्यांग मुलगी पुष्पा राऊत यांना पेंशन न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्या दोन्ही पायाने अपंग असून कर्णबधीर देखील आहे. मागील 15 वर्षांपासून शासन दरबारी पेंशन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.