बुलडाणा -राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ घेता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार, करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी लोकांना या निर्णयामुळे उपचार घेता येणार आहेत.
शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया व अन्य 120 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून, पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1 हजार 209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र, 23 मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो येाजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे.