बुलडाणा -दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून काही घातक शस्त्र ही जप्त करण्यात आली आहेत. कृष्णा अल्केश भोसले (वय २१, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, नंदलाल धनराज भोसले (वय ५२, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, विष्णू श्रीकृष्ण कोळी (वय २५, रा. बोदवड, ह. मु. कुऱ्हे, ता. मुक्ताईनगर, यशवंत प्रकाश पाटील (वय २२, रा. कुऱ्हे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
संशयित दरोडेखोरांकडून तलवार, घातक शस्त्र जप्त
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती, की काही दरोडेखोर मलकापूर परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येत आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6वर मंगळवारी रात्री सापळा रचला व मुक्ताईनगर परिसरातून चार युवक दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मलकापूर येथे येत असतांना तपासात निष्पन्न झाले. दरम्यान संशयितांकडून दोन दुचाकी, दोन लाकडी दांडके, एक स्टीलचा रॉड, पेचकच, मिरची पूड व धारदार पात्याची पितळी मूठ असलेली तलवार असा एकूण 1 लाख 14 हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जप्त केली आहे.
विविध कलमान्वये गुन्हे दाखल
या चारही आरोपींविरुद्ध मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे.