बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. ४० वर्षीय वासनांध मामाने अवघ्या १० वर्षीय चिमुकलीवर घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मामा भाचीच्या पवित्र नात्याला कालीमा फासणाऱ्या या नराधम मामा विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातून जोर धरू लागली आहे.
अमानुष लैंगिक अत्याचार :आरोपी पुणे येथे कामाला आहे. तो बुलढाणा जिल्ह्यात आपल्या बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलला रात्री त्या मामाने आपल्या १० वर्षीय भाचीचे तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलून नेले. तिच्यावर बळजबरीने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला. हे दृष्कृत्य केल्यानंतर तो पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. शहर पोलीस ठाण्यात याबाबत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. आरोपी मामाविरुध्द या प्रकरणी पोलिसांनी कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय) सहकलम ४, ६, ८ पोक्सो या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री शहर पोलिसांच्या डिबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे. शहरामध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे.