बुलडाणा- सरकार पाडायचे आहे, असे भाजपने कधीच म्हटलेले नाही. मात्र, कपटाने सत्तेवर आला आहात, तर सरकार चालवून दाखवा, जनतेची कामे करा, असे भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे म्हणाले. शरद पवारांच्या राज्य दौऱ्याबाबत विचारले असता, चांगल्या कामाचे कौतुक व्हायलाच हवे. मात्र, म्हाताऱ्या बापाला फिरावे लागते, जेव्हा पोरं निकम्मी असतात तेव्हा, असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.
शेगाव येथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कृषी विधेयकांचा विरोध करताना काँग्रेसने ट्रॅक्टर जाळल्याबद्दल संताप व्यक्त करताना, शेतकरी ज्याची पूजा करतात ती उपकरणे जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही ट्रॅक्टरचे पूजन करण्याचे अभियान करीत आहोत.