बुलडाणा - एका पत्रकाराने नांदुरा खुर्द येथील शेतकरी पुत्राचे 81 हजार रुपये पोलिसांमार्फत परत मिळवून दिले आहेत. या कृतीतून त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी घडल्याचे समोर आले आहे.
पत्रकाराच्या सतर्कतेमुळे मद्यधुंद शेतकरी पुत्राचे 81 हजार मिळाले परत नांदुरा खुर्द येथील सचिन वसंत कोल्हे हा 34 वर्षांचा तरुण शेती विकून 1 लाख रुपये खिशात घेऊन बुलडाणा शहरात नवीन मोटरसायकल खरेदीसाठी दाखल झाला होता. शहरातील जांभरुण मार्गावर इको बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत तो रस्त्याच्या कडेला पडला होता. या ठिकाणी भुरट्या चोरांचा वावर आहे.
त्याच्या खिशात पैशांचे 2 ते 3 बंडल होते. याच दरम्यान सकाळी एका वृत्तवाहीनीचे पत्रकार दीपक मोरे यांना संबंधित माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनाास्थळाला भेट दिली. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी तत्काळ दाखल होऊन सचिनच्या खिशातील 81 हजार 600 रुपये व मोबाइल ताब्यात घेतले. मद्यधुंद अवस्थेत डोक्याला थोडा मार लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान सचीनचा भाऊ सुशांत कोल्हे याला शहर ठाण्यात बोलावून ठाणेदार प्रदीप साळुंखे व दीपक मोरे, यांच्या हस्ते 81 हजारांची रक्कम, मोबाइल सुपूर्द करण्यात आले. यावेळी हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे, दत्तात्रय नागरे, संदीप कायंदे, सुनील दळवी, गजानन लहासे उपस्थित होते. दीपक मोरे यांनी समयसूचकता ठेऊन त्या ठिकाणी थांबले नसते, तर चोरांनी 81 हजार रुपये लंपास केले असते. यामुळे पोलिसांनी मोरे यांचे आभार मानले.