बुलडाना -मागील वर्षी भरलेल्या पीक विम्याचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. खामगाव तालुक्यातील शेतकरी अमोल तोंडे, श्रीकिसन पानगोळे यांच्यासह 15 शेतकऱ्यांनी हे निवेदन दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वैरागड या गावातील काही शेतकऱ्यांची शेती खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द, झोडगा, नागझरी बु, या गावास शिवारात आहे या शेतकऱ्यांनी 2017-2018 करिता आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा काढला होता. सदर विम्याचे हप्तेदेखील भरले होते. मात्र, वारंवार अर्ज करुनही त्यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. शिवाय, उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला पिक विमा देण्यापासून वंचित ठेवले आहे, असे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.