बुलडाणा - राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे शनिवारी जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी ते खामगाव येथे असताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आपण या सर्व समस्या तत्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिलीपकुमार सानंदा यांना दिले.
शनिवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी खामगाव येथील त्यांच्या नातेवाईकांसह भाजपचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचे निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, ते त्यांचे नातेवाईक सातपुते यांच्या निवासस्थानी आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांची भेट घेतली. खामगाव नगरीत प्रथमच आल्याबद्दल त्यांचे स्वागत सत्कार केला. यावेळी सानंदा यांनी खामगाव आणि शेगाव येथील कृषी कार्यालयांमध्ये हे कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर त्यांनी सांगितले की, नुकतीच नवीन भरती करण्यात आलेली आहे. विदर्भाबाहेरील अधिकारी आणि कर्मचारी परत जाण्यासाठी बदल्या मागत आहेत. मात्र, मी माझ्या विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कुणाचीही बदली करू नये व ज्याची बदली झाली त्याला रिलीव्ह करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता सुटतील, असेही त्यांनी सांगितले.