बुलढाणा: शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार सरकार गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पिकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. रविकांत तुपकर यांनी स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला आता मागे हटणार नाही, असे म्हणत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले आहे.
सप्टेंबर २०२२ पासून लढा सुरू: शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर २०२२ पासून लढा देत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा, त्यानंतर राज्याचे कृषि सचिव, कृषि आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरवा केला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा आणि त्यांचे केंद्राला पत्र, २३ जानेवारी रोजी मानवत जिल्हा परभणी येथे कापूस व सोयाबीन दरवाढीसाठी मोर्चा, हिंगोली तसेच वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व रिसोड येथे पिकविमा व सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी मोर्चे अशी सातत्याने आंदोलने सुरु असतानाही केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे आता शेवटी आरपारची लढाई लढणार असल्याचे रविकांत तुपकरांनी ४ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले होते.