बुलडाणा - माळविहीर येथे सुरू असलेले बेकायदा उत्खनन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संदरखेड येथील दोन शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण - बेमुदत उपोषण
माळविहीर येथे सुरू असलेले बेकायदा उत्खनन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संदरखेड येथील दोन शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
माळविहीर शिवारात तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र. 56, 57, 58 ला लागून शेतकरी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड यांचे गट क्र. 59 आणि 60 मध्ये शेती आहे. तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र.56 मध्ये गौण खनिज विभागाने 1.63 आर जमिनीत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. त्यावर तुकाराम चव्हाण हे या ठिकाणी स्फोट करून उत्खनन करत असतात. पण, गायकवाड यांच्या शेतीला लागून असलेले गट क्र. 57 व 58 मध्ये अवैधपणे स्फोट करून उत्खनन केले जात आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या शेतात मोठे दगडे, माती येत आहे. यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे 100 ते 130 फुटांपर्यंत खोदकाम केल्याने शेतीत माती वाहून जाऊ शकते, अशी भीती गायकवाड व्यक्त करत आहेत.
हे उत्खनन बंद करण्यात यावे. यासाठी शेतकरी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड यांनी तक्रार अर्ज दिल्यावरही उत्खनन बंद करण्यात आले नाही. हे उत्खननाचे काम बंद करण्यात यावे, या मागणीसाठी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड हे शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.