बुलडाणा -पणन महासंघाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि सिंदखेडराजा येथील कापूस संकलन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. मात्र, महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे या केंद्रांवर शेतकऱ्यांना 7 ते 8 दिवस थांबावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आज (शनिवारी) कापूस खरेदी केंद्रावर त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क अधिकाऱ्यासमोरच विष पिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुलडाण्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न हेही वाचा - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका
जळगाव जामोद येथे पणन महासंघाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतातील कापूस ट्रक्टरच्या साहाय्याने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. 7 ते 8 दिवसांपासून एकाच ठिकाणी ट्रॅक्टर उभे असल्याने अवकाळी पावसाचा फटका कापसाला बसत आहे. त्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होत असून कापूस मालाला योग्य भाव मिळणार नाही, अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. शिवाय ट्रॅक्टरचे भाडे दिवसागणिक वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
चिडलेल्या शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांना घेराव घालून आमचा कापूस खरेदी करा, अशी विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या किशोर दाताळकर या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शेतकऱ्याला वाचविले. काहींनी कापसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवून देण्याची धमकी दिली. यामुळे केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कापूस जलदगतीने खरेदी केला जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
हेही वाचा - परांड्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; तहसीलदाराच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर