बुलडाणा - "माझ्या पतीने देशासाठी बलिदान दिले, ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. मात्र, कुटुंबच हरवल्यानं उदरर्निवाहासाठी केंद्र सरकारनं आम्हाला अजूनही मदत केलेली नाही" ही भावना व्यक्त करताना वीर पत्नी सुषमा राजपूत यांना अश्रू अनावर झाले. पुलवामा हल्ल्याला एक वर्ष होत आहे. परंतु, हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबीयांना अद्यापही केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. सरकारने केवळ आश्वासने दिली. मात्र, अद्याप ती पूर्ण केली नाहीत. अक्षरशः हे कुटुंबीय मदतीसाठी कार्यालयाला खेटे घालून थकले आहेत.
हेही वाचा -'पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला'
पुलवामा हल्लाला आज वर्षपूर्ती होत आहे. १४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, अवंतीपोराजवळ 'केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स'च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर, दुपारी सुमारे सव्वा तीन वाजता अतिरेक्याने वाहनासकट हल्ला केला. या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे ४० जवानांना वीरमरण आले. जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे जवान हुतात्मा झाले होते. मात्र, घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही, ज्या वीरांनी आपला परिवार सोडून देशाच्या रक्षणार्थ आपला जीव गमावला, अशा जवानांचे परिवार आज उघड्यावर पडले आहेत.
केंद्र सरकारने पुलवामा घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. हुतात्मा संजय राजपूत यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वीर पत्नी सुषमा राजपूत यांचे अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, "माझ्या पतीने देशासाठी बलिदान दिले, ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. मात्र, त्यांच्या जाण्याचे दुःख आणि कुटुंबाच्या जबाबदारीतून पळणार नाही. ईश्वर मला या दु:खातून नक्कीच सावरेन" अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्याला केंद्र शासनाने केलेल्या मदतीची घोषणेची पूर्तता झालेली नाही. तर दुसरीकडे राज्य शासनाने जाहीर केलेले ५० लाख रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.