बुलडाणा- महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी खामगाव येथे दिवगंत पांडुरंग फुंडकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त 'खानथडी जत्रा' नावाने मेळावा घेण्यात आला. हा मेळावा 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता. मात्र, या जत्रेत आयोजकांचीच 'जत्रा' झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावेळी शासनाचे 55 लाख रुपये घश्यात घालून भाजपचा केल्याचा आरोप देखील काँग्रेसचे नेते दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.
हेही वाचा -प्रेम प्रकरणातून हाणामारी करणाऱ्या दोन प्रियकरांना अटक, पिस्तुलासह कोयता जप्त
तर काँगेसच्या माजी नगराध्यक्षा सरस्वती खाचने यांनी देखील माँ जिजाऊंच्या जिल्ह्यात महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली लावणीचा कार्यक्रम ठेवल्यामुळे निषेध नोंदवला. तर आयोजकांकडून नियोजन अभावचा फटका या जत्रेमध्ये आलेल्या महिला बचत गटांना बसला आहे. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे आणि सुविधा नसल्याने काही महिला स्टॉल न लावताच निघून गेल्या. त्यामुळे या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे प्रदर्शनात 85 गटांपैकी फक्त 26 स्टॉलच उरले आहेत.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू आणि कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खामगावच्या पालिका मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी मैदानावर 130 स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी महिलांसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे काही महिला स्टॉल न लावताच परतल्या. यावेळी बचत गटाच्या महिला चांगल्याच संतापल्या होत्या. विशेष म्हणजे महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुरुषाकरीता लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.