बुलडाणा- शेगाव नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. यात ११ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेला दिले होते. मात्र, त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
शेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
शेगाव येथील मातंग पूर्व वस्तीमधील नागरिकांना शासनाने शहरालगतच्या म्हाडा कॉलनीमध्ये स्थलांतरित केले असून याठिकाणी सुख-सुविधांचा अभाव आहे. शनिवारी पहाटे या कॉलनीमधील जगदेव फकिरा तायडे यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लहान-मोठ्या अकरा शेळ्यांच्या जागीच मृत्यू झाला असून दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
जयदेव तायडे हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता तेथे कुत्रे बकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. या घटनेमध्ये तायडे यांचा 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक वेळा नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून ही संख्या पाच हजारांच्यावर असल्याचे नागरिकांनी म्हटले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी पट मुल्ला भागातील पेठ परिसरात लहान बालकांनाही मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे आजच्या घटनेने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती रोष पाहावयास मिळाला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळातून झालेल्या नुकसानीबाबत तक्रार तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा - शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..