बुलडाणा -डॉक्टरांमध्ये परमेश्वराचं रूप पाहिलं जातं, मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे कधी-कधी रुग्णाला आपल्या जीवाला मुकावे लागते. म्हणून कधी-कधी डॉक्टरामध्ये यमदूतही पाहायला मिळतो. अशाच एका डॉक्टराच्या चुकीमुळे एका महिलेला आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात घडला आहे. खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती दरम्यान सिजरिंग शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच बेंडेजचा बोळा विसरल्याने महिलेला पौझनिंग झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला, अशी तक्रार करून हलगर्जीपणा करून सिझरिंग शस्त्रक्रिया दरम्यान पोटात बेंडेजचा बोळा विसरणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महिलेच्या पतीने खांमगाव शहर पोलिसात केली आहे. मृत महिलेच्या पतीने या प्रकाराची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेगी केली आहे. विशेष म्हणजे सिझरिंगमध्ये जन्माला आलेल्या बाळाला आपल्या आईला गमवावे लागले आहे. पूजा पाखरे असे मृत महिलेचा नाव आहे.
प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात डॉक्टर विसरले बँडेजचा बोळा काय आहे प्रकार - बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील पूजा पाखरे या महिलेला प्रसूतीसाठी खामगावच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. नॉर्मल प्रसूती होत नसल्याने पूजाचे सिजर शस्त्रक्रिया करण्यात आली. पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. दरम्यान पूजाचे पोट दुखत असल्याने पूजाला ११ एप्रिलला अकोला येथे रेफर करण्यात आले. तब्येत बरी झाल्यावर अकोला येथील मुख्य सामान्य रुग्णालयातून १९ एप्रिलला पूजाला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु १० जून रोजी पूजाला पोटदुखीचा पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी पूजाला पुन्हा खामगावच्या डॉ. अरविंद पाटील यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यावर पोटात काही तरी गोळा आढळून आला. त्यामुळे १२ जूनला डॉक्टांच्या सल्ल्यानुसार आणि पूजाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या पतीने परमेश्वर पाखरे यांनी पूजाचे माहेर म्हणजेच मोताळा येथील डॉ. शरद काळे यांच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचरासाठी पाठविले. त्याठिकाणी पूजावर शस्त्रक्रिया करताना पूजाच्या पोटात चक्क बँडेजचा बोळा असल्याचे लक्षात आले. तो बोळा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. यावेळी पुजाला वेदना असह्य झाल्याने आणि ऑक्सिजन लागत असल्याने पूजाला पुन्हा बुलडाणा येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र पूजाच्या पोटात पौझनिंग झाल्याने त्याच दिवशी रात्री ११ वाजता पूजाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने जगाचा निरोप घेतला. मात्र यावेळी पूजाने जन्म दिलेल्या दोन महिन्याचा बाळ पोरका झाला.
पोटाच्या आतड्याला गुंडाळलेला होता बँडेजचा बोळा -
पूजाला पोटात पौझनिंग झाल्याने पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी जेव्हा माझ्या रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्यांच्या संपूर्ण चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अचूक होत्या. शस्त्रक्रिया करताना पूजाच्या पोटात असलेले आतड्याला गुंडाळलेला बँडेजचा बोळा बाहेर काढण्यात आला. जो बँडेजचा बोळा बाहेर काढण्यात आला आहे. तो सिजरिंग करताना रक्त पुसताना वापरले जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूजाचा ब्लडप्रेशर कमी झाल्याने रुग्णाला आयसीयूची गरज असल्याने मी त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाण्याच्या खासगी रुग्णालयात पाठविले. अशी माहिती मोताळ्याचे डॉ. शरद काळे यांनी दिली.
चौकशीसाठी समिती स्थापन -
खामगावच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळे एका गोंडस मुलाला आपली आई गमवावी लागली. त्यामुळे चुकी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, यासाठी मृत पूजाचे पती परमेश्वर पाखरे यांनी खांमगाव शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरावर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार एक समिती तयार करून चौकशी करत असून जे कोणी डॉक्टर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली आहे.