बुलडाणा - कधीही न थांबणारे देश कोरोनामुळे थांबले. सर्वत्र लॉकडाऊन आहे. या परिस्थितीत माणुसकी मात्र थांबली नाही. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. हॉटेल बंद, दुकाने बंद. मग भिकारी, अंध-अपंग निराधार पोटभर जेवणार कुठे? या प्रश्नाला हात घालत येथील तरुणांनी माणुसकीचा ओलावा जपत अनेक उपेक्षितांना पोटभर जेवण देत आहे. २३ मार्चपासून बुलडाणा शहरात दररोज सकाळी-संध्याकाळी 22 ते 25 उपेक्षितांना अन्न वाटप करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी, बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे.
'लॉक डाऊन'मध्ये तरुणांकडून उपेक्षितांना दोन वेळचे अन्नदान.. - coron update buldhana
२३ मार्चपासून बुलडाणा शहरात दररोज सकाळी-संध्याकाळी 22 ते 25 उपेक्षितांना अन्न वाटप करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी, बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या काळात पैसे असणारे सक्षम लोक घरात राहून उपजीविका भागवू शकतात. मात्र, रस्त्यावरील भिक्षेकरी, मनोरुग्ण किंवा निराश्रीत, गरजूंचे अन्नाविना प्रचंड हाल होत असल्याची भावना लक्षात घेऊन त्यांच्या पोटप्रश्नासाठी "लॉक डाऊनमध्ये भुकेल्यांना दोन घास खाता यावे" यासाठी दोन वेळच्या जेवणाचा उपक्रम येथील तरुणांकडून हाती घेण्यात आला आहे.
भुकेलेल्याला अन्नदान करण्यासारखे दुसरे पुण्य नाही,असे म्हणतात. "दानात पुण्य आणि सेवेत आनंद" असे ब्रीद घेऊन बुलडाणा शहरातील बसस्थानक परिसर, संगम चौक, कारंजा चौक, जांभरूण रस्ता, गजानन महाराज चौक, धाड नाका, त्रिशरण चौक, चिखली रोड, खामगाव रोड, मलकापूर रोड, यासह महाराष्ट्रतील गोदिया, मुंबई, सालेकास व निवारा केंद्र या भागात वरण-भात, भाजी-पोळी, असे पदार्थ असलेले जेवण गरजूंना देण्यात येत आहेत.