बुलडाणा- जिल्हा कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघातर्फे सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानसिक ताण देणाऱ्या, छळ करणाऱ्या आणि अपप्रवृत्तीच्या लोकांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक गांधी भवन येथून मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले, त्यांना सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरवले. सुरुवातीला गांधी भवन येथून एल्गार मोर्चाला सुरुवात करण्यात आली, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक येथून एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.
कसला तरी हेतू डोळ्यासमोर ठेऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, भ्रष्टाचार निर्मूलन या आशयाच्या विविध बेकायदेशीर समित्यांमार्फत तक्रारी करणे. अनेक प्रकाराद्वारे विविध अर्ज, तक्रारी करणाच्या कार्यकत्यांचा सूळसुळाट झालेला आहे. अशाच प्रकारच्या प्रकरणात बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांचेवर बेकायदा कामासाठी वारंवार दबाव टाकून आणि रस्त्यात पिस्तुलाचा धाक दाखवून मिठ्ठू परमेश्वर जालान या व्यक्तीने त्यांना धमकावले. याबाबत संबंधिताला अटक करण्यात आलेली आहे. चुकीचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन तक्रारी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाई होत नसल्यामुळे त्यांची हिम्मत वाढत चालली आहे.
प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी हे तणावाखाली काम करत आहेत. वास्तविक माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यास आम्ही त्यांना उपलब्ध असलेली माहिती देण्यास बांधिल आहोत. परंतु, बरीच पदे रिक्त असल्याने बहुतांश लोकांकडे अतिरिक्त प्रभार आहेत. त्यामुळे एखाद वेळी कामाच्या व्यापामुळे माहिती देण्यास दिरंगाई होते. त्याचाच गैरफायदा घेऊन अपप्रवृत्तीचे लोक ब्लॅकमेलींग सुरू करतात. ब्लॅकमेलींगला प्रतिसाद न दिल्यास वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात. याप्रकारामुळे अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत, अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.