बुलडाणा - जिल्ह्यातील मोताळा येथील स्वॅब न घेताच एका नागरिकाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची घटना होते न होते तोच जिल्ह्यातील आदिवासी भागातील संग्रामपूर आरोग्य विभागाचे भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावातील 18 वर्षीय कोरोनाबाधित युवकाला संग्रामपूर येथील कोविड केंद्रामधून मुदतबाह्य औषधे देण्यात आले आहेत. चार ते पाच दिवस औषधे घेतल्यावर युवकाच्या लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील कर्मचारी दिलेले मुदतबाह्य औषधं युवकाला परत देण्याची विनंती करत होते.
हेही वाचा -महा अर्थसंकल्प २०२१ : रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
असा समोर आला प्रकार-
बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील कोलद येथील एका युवकाला सर्दी खोकल्याचा त्रास झाला. तो 28 फेब्रुवारीला वरवट- बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तेथील डॉक्टरांनी त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला कुठलेही औषध न देता त्याला आरटी-पीसीआर टेस्टसाठी संग्रामपूर येथील कोविड सेंटरला पाठवले. संग्रामपूर येथे सदर तरुणाचा स्वॅब घेतल्यावर त्याला तेथील डॉक्टरांनी औषधे देऊन रिपोर्ट येईपर्यंत घरी विलगीकरणासाठी पाठवले. अनेक दिवस ते औषधं खाल्ल्यानंतर अचानक या युवकाच्या लक्षात आले की, त्याला सप्टेंबर 2020 रोजीचे मुदतबाह्य औषधं देण्यात आली. त्यामुळे हा प्रकार समोर आला. संग्रामपूर येथे कोरोनाबाधित रुग्णाला मुदतबाह्य औषध दिल्याचा प्रकार समोर आल्याने मोताळ्यानंतर पुन्हा संग्रामपूर येथे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार लक्षात आला आहे.
हेही वाचा -महिला दिनी गिफ्ट: महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात मोठी सवलत