बुलडाणा - जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अवैधरित्या मेंढी चराई करण्यासाठी गेलेल्या मेंढपाळांनी वन कर्मचाऱ्यांवर लाठयाकाठ्यांनी हल्ला केला. तर वन्य कर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (10 ऑगस्ट) घडली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर मेंढपाळ घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे हेही वाचा -नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय दुर्घटना, ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांना २४ लाखांचा दंड
- हल्ला करण्यावेळी 3 वेळा हवेत गोळीबार -
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव नाथ परिसरामधील सुई टेकडी परिसरात काही मेंढपाळ त्यांच्या बकऱ्यांसह अवैध प्रवेश करून, चराई करत असल्याची माहिती खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांना मंगळवारी मिळाली. त्या आधारे पिंपळगाव नाथमधील सुई टेकडी येथे पथक कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी काही मेंढपाळांनी कर्मचार्यांवर काठीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांनी त्यांच्या जवळ असलेल्या 9 एम एम पिस्टलने प्रथम हवेत एकदा गोळीबार केला. त्यावेळी 35 ते 40 मेंढपाळांनी लाठ्याकाठ्यासह लोखंडे यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने येताना दिसल्याने पुन्हा वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांनी दोन वेळा हवेत गोळीबार केला. त्यामुळे अज्ञात 35 ते 40 मेंढपाळांनी मेंढी-बकऱ्यासह तेथून पळ काढून जंगलात फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, अज्ञात 35 ते 40 मेंढपाळांवर भारतीय वन अधिनियम नुसार विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा -चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला