बुलडाणा- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयचं आजारी पडल्यासारख्या अवस्थेत दिसून येत आहे. स्वच्छता आणि या रुग्णालयाचा काहीही एक संबंध नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. उपचारासाठी येथे आलेला रुग्ण बरा व्हायच्या ऐवजी आणखी जास्त आजारी पडतो, अशा प्रकारे या रुग्णालयात आणि परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या घाणीमुळे डुकरांचा मुक्त संचारही या रुग्णालय परिसरात आढळून येतो. हे सर्व घाणीचे साम्राज्या समोर दिसत असचानाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
एकूण 100 खाटांच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधांचा अभाव असल्याने अनेकदा रुग्णांची हेळसांड होते. रुग्णालय परिसरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा दोन्ही बाजूंनी रिक्षांची रांग लागलेली असते. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही. रुग्णालयात प्रवेश करताच सगळ्या वार्ड समोर रुग्णांची गर्जी दिसते ती फक्त डॉक्टरसाहेबांच्या येण्याची वाट पाहत असलेली. मात्र, डॉक्टर वेळेवर येत नसल्याची तक्रार येथील रुग्णांकडून केली जाते.
कित्येकदा डॉक्टरच हजर नसल्याने तसेच अपुऱ्या साधनांच्या अभावामुळे रुग्णांना अकोला किंवा औरंगाबादला पाठवले जाते. मुळात सरकारी दवाखाना हा गोरगरीब जनतेला मोफत सुविधा मिळाव्यात याकरिता असतो. मात्र, बुलडाण्यातील परिस्थिती याउलट आहे. ज्या रुग्णांना बाहेरगावी रेफर केले जाते त्यांना रुग्णवाहिकेची मोफत सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात नाही. अपघात झालेल्या रुग्णांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सामुग्री नाही. सिटी स्कॅन मशीन , एक्स रे मशीन जुनाट झाल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव बाहेर 800 ते 1000 रुपये खर्च करावे लागतात.