बुलडाणा -राज्यात ठिकठिकाणी मोसमी पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. शेतकरी बियाणे, खते यांचे नियोजन करत आहेत. कृषी विभागामार्फत महामंडळाकडून पेरणीसाठी बियाणांची साठवणूक करून न ठेवलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप अपेक्षित असताना बुलडाणा कृषी विभागाचे गलथान कारभार समोर आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी साठवणूक करून बियाणेच ठेवले नाही. अशा शेतकऱ्यांकडे साठवणूक करून शेकडो क्विंटल बियाणे असल्याचे कृषी विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये दाखविण्यात आले. त्यामुळे बियाणे वाटपामध्ये अनियमितता झाल्याचे समोर येत असून ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत दाखविण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांना बियाणे खासगी कृषी केंद्रांकडून खरेदी करण्याची वेळ आली आहे.
बियाणे मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार
बुलडाणा जिल्ह्यामधील घाटावरील भागात सोयाबीनचे उत्पादन घेणारे शेतकरी भरपूर आहेत. दरवर्षी महामंडळ बियाणे स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना ते परवडते, मात्र यावर्षी महामंडळाचे बियाणे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्धतेनुसार साठवणूक केलेले बियाणे नाही. अशा शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेले बियाणे असल्याचे कृषी विभागाने जाहीर केलेल्या एका यादीमध्ये उपलब्धतेनुसार साठवणूक केलेले बियाणे असल्याचे दाखविण्यात आल्याने आमच्याकडे तर उपलब्धतेनुसार साठवणूक केलेले बियाणेच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्याजवळ स्वतःचे बियाणे असते तर आम्ही खासगी कंपनीचे चढ्या दराने हे बियाणे विकत घेतले असते का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
चुकीची माहिती भरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बुलडाणा तालुक्यातील धाड गावात सुरज सरोदे या शेतकऱ्याकडे 3 एकर शेती असून कृषी विभागाच्या यादीत त्यांच्याकडे उपलब्धतेनुसार 22 क्विंटल बियाण्यांची नोंद आहे. त्यामुळे 3 एकर शेतीमध्ये 22 क्विंटल जरी झाले तर मी विकणार किती? आणि खाणार किती? असा प्रश्न उपस्थित करून माझ्याकडे सध्या एक किलोही बियाणे नाही. मी आत्ताच गावातील खासगी बियाणे लक्ष्मी ट्रेडर्स येथून 60 किलो बियाणे विकत घेतले आहे. माझ्याजवळ बियाणे उपलब्ध असूनही मला पुन्हा बियाणे विकत घेण्याची हाऊस आली आहे का? अशा शब्दात शेतकरी सुरज सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय धाड येथील शेतकरी दत्ता गायकवाड यांच्याकडे 2 एकर शेती असून त्यांच्याजवळ ही 24 क्विंटलपर्यंत बियाणे असल्याची दाखविले आहे. माझ्याकडे 2 एकर शेती आहे. तर 24 क्विंटल बियाणे आले कुठून असे म्हणत ही यादी चुकीची असून घरी बसवूनच ही यादी तयार केली गेली असल्याचे सांगून अशा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी दत्ता गायकवाड यांनी केली आहे. तर धाडचे शेतकरी प्रमोद वाघूर्डे यांनी देखील शेतकऱ्यांकडे बियाणे नसताना त्यांच्याजवळ बियाणे आहे. अशी चुकीची माहिती आपल्या यादीत प्रसिद्ध केल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून शेतकऱ्यांना चढ्याभावाने बियाणे घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्या अंधाधून कारभारामुळे नुकसान होत असल्याचे सांगितले आहे.