बुलडाणा : शिवसेना पक्ष हा हिंदुत्वापासून कधीच दूर गेला नाही. हिंदुत्व म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणे. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मत कृषीमंत्री दादा भुसेंनी आज व्यक्त केले. ते बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्याबाबत केंद्रावर टीका केली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार, आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
'हिंदुत्व म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं नव्हे' - कृषीमंत्री दादा भुसे कृषी कायदे करताना राज्यांना विश्वासात घ्यायला हवे
कृषी कायदे करताना केंद्र सरकारने राज्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र केंद्राने ते न करता, केवळ काही लोकांना ज्याचा फायदा होईल असे कृषी कायदे तयार केले अशी टीका भुसे यांनी यावेळी केली.
पाच जागांवर होतेय निवडणूक
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी भूसे बुलडाण्यात आले होते. ही जागा आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. पाच पैकी दोन जागांवर काँग्रेस, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि एक जागेवर शिवसेना निवडणूक लढत आहे. एक डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
भाजप शिवसेना आमने सामने
गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार पण भाजपचाच असे वक्तव्य विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तर खरा भगवा हा शिवसेनेचाच असल्याचे संजय राऊत यांनी सांगत भाजपवर टिका केली होती. हिंदूत्वावरूनही भाजपने शिवसेनेला लक्ष केले होते. त्याला शिवसेनेने ही जशास तसे उत्तर दिले.