माहिती देताना पोलीस अधिकारी बुलढाणा - संपूर्ण जिल्ह्यात चर्चा असलेल्या राजूर घाटातील कथित बलात्कार प्रकरणामध्ये आता वेगळेच वळण लागले आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अत्याचाराचे कलम लावून गुन्हे दाखल केले होते. पण पीडित महिलेने आरोपींनी फक्त मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देत दोन मोबाईल व ४५ हजार रुपये हिसकावून घेतल्याचा जवाब दिला. तसेच आपल्यावर अत्याचाराचा प्रकार झाला नसल्याचे पीडितेने सांगितले.
13 जुलैला अत्याचारासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आठ आरोपींनी तक्रारदारासमोरच पीडितेवर सामूहिक अत्याचार केला अशा तक्रारीवरून सुरुवातीला 329/2023, कलम 307, 395, 376, 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 14 जुलैला पीडितेने महिला पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात असे सांगितले की, माझा मोबाईल व पैसे आरोपींना काढून घेतले. तसेच मला मारण्याचा प्रयत्न केला. तक्रारदारालाही मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सामूहिक, लैगिंक अत्याचार झाला नाही. आठपैकी पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत - गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा
पाच आरोपी ताब्यात -आता पोलिसांना या प्रकरणाची नव्याने पुन्हा चौकशी करावी लागणार आहे. तक्रारदाराने संशयित आरोपींबद्दल दिलेली तक्रार आणि महिलेने नोंदवलेला जवाब यात तफावत असल्याने पोलीस संभ्रमात पडले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी कशी होते याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठपैकी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
महिलेने दिले जबाब - बुलढाणा शहरानजीकच्या राजूर घाटात देवीच्या मंदिराजवळ १३ जुलै रोजी एका महिलेवर सात ते आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या कथित प्रकरणाला नवे वळण लागले आहे. पीडित महिलेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा जबाब दिला आहे.
अत्याचाराचा गुन्हा दाखल - सामूहिक बलात्कारसंदर्भाने वैद्यकीय तपासणी करण्याची गरजही नसल्याचे पीडितेने मोताळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे लिहून दिले आहे. पीडित महिलेचा मोताळा न्यायालयातही इन कॅमेरा जबाब घेण्यात आला आहे. या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी पीडित महिलेच्या समवेत असलेल्या नातेवाईक व्यक्तीच्या तक्रारीवरून प्रकरणात पीडितेवर सामूहिक बलात्कारासह, खूनाचा प्रयत्न आणि मारहाण करत लुटमार करण्यासोबतच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी १३ जुलै रोजी रात्री बोराखेडी पोलिसात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आमदारांचा ठिय्या -या प्रकरणात पोलीस मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील राहूल रमेश राठोड याच्यासह अन्य संशयित आरोपींच्या शोधात आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहता बुलढाणा, बुलढाणा ग्रामीण आणि धामणगाव बढेचे ठाणेदार यांनी १३ जुलै रोजी रात्री बोराखेडी पोलीस ठाणे गाठले होते. प्रकरणाची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनीही बोराखेडी पोलीस ठाणे गाठत पोलीस प्रशासनाला अशा गंभीर प्रकरणात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत धारेवर धरले होते. तसेच पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते.
न्यायालयातही नोंदविली साक्ष - पीडित महिलेचा मोताळा न्यायालयात कलम १६४ अंतर्गत इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आला आहे. बऱ्याचदा काही प्रकरणात प्रसंगी साक्ष किंवा जबाब फिरवला जातो. अशा स्थितीत न्यायालयात इन कॅमेरा नोंदवलेला जबाब हा महत्त्वपूर्ण साक्ष म्हणून गणला जातो.