बुलडाणा -कोरोना विषाणूवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. पहिल्या दोन फळीतील लसीकरणानंतर तिसऱ्या फळीतील लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांवरील व्यक्तीना उद्यापासून लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील 13 शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी विनामुल्य लसीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा -बुलडाण्याच्या राजुर घाटाच्या जंगलाला आग; पर्यावरणप्रेमी, वनविभागान व अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
अमृत हृदयालय व मेहेत्रे रुग्णालय बुलडाणा, कोलते रुग्णालय मलकापूर व कोठारी रुग्णालय चिखली या चार खासगी रुग्णालयांमध्ये दोन डोसेससाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी,अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. सावके उपस्थित होते.
अॅप, संकेत स्थळावर व केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार नोंदणी
लसीकरणासाठी कोविन (COWIN), आरोग्य सेतू (AAROGYA SETU) या ॲपवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, https://selfregistration.cowin.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ॲप, संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्राच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण सत्राचे ठिकाण, दिनांक व वेळ याची माहिती देण्यात येणार आहे.