बुलडाणा - प्रेमाच्या भावविश्वात रमत गप्पा करणार्या एका प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. मंगळवारी नांदुरा बसस्थानकात ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
VIDEO : बुलडाण्यात बसस्थानकात प्रेमीयुगुलाला जबर मारहाण, पोलिसात तक्रार नाही - व्हायरल
विद्यार्थिनी मंगळवारी १६ एप्रिलच्या दुपारी आपल्या प्रेमी मित्रासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती. मुलीच्या कुटुंबियांनी बसस्थानकात दोघांना रंगेहात पकडले आणि तेथेच त्यांना बेदम मारहाण केली.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. यातील एक विद्यार्थिनी मंगळवारी १६ एप्रिलच्या दुपारी आपल्या प्रेमी मित्रासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती. याची माहिती तिच्या कुटुंबियातील मंडळींना मिळाली. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी बसस्थानकात दोघांना रंगेहात पकडले आणि तेथेच त्यांना बेदम मारहाण केली. मुलीसह तिच्यासोबत बोलत असलेल्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीनंतर मुलीकडील मंडळी तिला घेवून निघून गेली. या घटनेचे उपस्थित प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तर, काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरात होत आहे.