बुलडाणा -चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या विस्तारित बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. रोजगार सेवकाने बोगस हजेरीपट भरून लाखो रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही मर्जीतील 20 कामगारांनी काम केल्याचे दाखवून पैसे उकळण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात रोहयो कामात भ्रष्टाचार, आरोपींविरोधात कारवाईची मागणी - रोजगार हमी योजना बातमी
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या विस्तारित बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. रोजगार सेवकाने बोगस हजेरीपट भरून लाखो रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही मर्जीतील 20 कामगारांनी काम केल्याचे दाखवून पैसे उकळण्यात आले आहेत.

यासंदर्भात प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांसह ग्रामस्थांनी 26 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून, रोजगार सेवक रंगनाथ सावळे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, निवेदन देवून 9 दिवस झाले तरी देखील अद्याप या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झालेली नाही. तर दुसरीकडे रंगनाथ सावळे यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
बिहार राज्यात वृक्ष लागवड करून, त्या वृक्षांचे संगोपन करण्याची योजना राबवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत स्थरावर रोजगार हमी योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात येते. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे सन 2018 मध्ये ही योजना राबवण्यात आली होती. त्यामध्ये रोजगार सेवक रंगनाथ सावळे यांने प्रत्यक्ष कामावर हजर नसलेल्या मजुरांना हजरी पटावर दाखवून त्यांच्या नावावर पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत बोलताना ग्रामसेवक बी.एन बोरकर यांनी म्हटले की, तक्रार सन 2018 मधील केलेल्या कामांबाबतची आहे. मी सन 2019 मध्ये रुजू झालो आहे. केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर रोजगार सेवक रंगनाथ अंबादास सावळे दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.