बुलडाणा - कोरोना विषाणू संसर्गापासून खबरदारी म्हणून राज्यातील जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, मोठ-मोठ्या यात्रा, उत्सव यांच्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला महाविकास आघाडीच्या मंत्रीच जुमानत नसल्याचे समोर आले आहे. हे मंत्री हजारोंच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. यावरून कोरोना विषाणूबाबत महाविकास आघाडीचे मंत्री किती सतर्क आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देशाची दुसऱ्या क्रमांकाची यात्रा असलेली सैलानी यात्रा, 8 मार्चचे महिला दिनाचे कार्यक्रम आणि ज्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू शकेल, असे कार्यक्रम 6 मार्चलाच रद्द केले होते. हा निर्णय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी घेतला. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खामगावात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारला. शिवाय, डॉ. शिंगणे राज्याचे अन्न व औषध मंत्री असूनही त्यांनी रविवारी (8 मार्च) महिलादिनी हा सत्कार स्वीकारला, ही बाब गंभीर आहे.
शिंगणें यांच्या सत्कार कार्यक्रमावर जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे. 'जमावबंदीच्या आदेशातून कोणालाही सूट मिळत नाही. एखादया विशिष्ट ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचा आदेश निघाला असेल तर, नागरिकांसह तो लोकप्रतिनिधी, मंत्री, प्रशासकीय अधिकारी या सर्वांना समानपणे लागू होतो. सगळ्यांनी शासनाच्या नियमांचे किंवा आदेशांचे पालन केले पाहिजे. कारण, शासन आपणच आणि आपणच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करायला लागलो तर लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दांत जाधव यांनी टीका केली.