बुलडाणा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करून विनाकारण न फिरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. तरीही बरेच लोक राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून खामगावामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना रॅपिड चाचणी केली जात आहे.
१२५ जणांची करण्यात आली रॅपिड कोरोना चाचणी -
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्याही ५१ हजाराच्यावर पोहोचली आहे. तर ६ हजारांच्यावर कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणा व प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी यंत्रणेची धावपळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस, नगरपरिषद, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिडद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. सकाळपासून रस्त्यावर विनाकारण पायी फिरणारे, दुचाकी व चार चाकी वाहनांमधून फिरणाऱ्यांची चाचणी केली जात आहे. शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर दांडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईमध्ये १२५ जणांची चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये ६ जण हे कोरोना बाधीत म्हणून आढळले आहेत.