बुलडाणा -प्रत्येक धर्मातील विवाह करण्याची पद्धत वेगळी असली, तरी त्यात प्रमुख आकर्षण असते ते बँड पथकाचे. या बँड पथकात सनई, चौघडा, ढोल, ताशा यांसह नवनवीन वाद्य वाजवण्यात येतात. यावर्षी मात्र या बँड पथक व्यवसायिकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे.
कोरोना आणि त्यामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारचे सार्वजनिक समारंभ बंद करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणारे विवाह सोहळ्यांना देखील बंदी घालण्यात आली. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका बँड पथकांना बसला. अख्ख्या हंगामात एकदाही बँड पथकाला काम मिळाले नाही. त्यामुळे या लोकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे लग्नासाठी घेतलेल्या सुपाऱ्या बुडाल्या... बँड पथकांवर उपासमारीची वेळ हेही वाचा...औरंगाबादला वाघाच्या पिंजऱ्यात झोपला तरुण, थोडक्यात वाचला जीव
बुलडाण्यातील बँड पथक चालक सुभाष निकाळजे यांनी यावर्षीच्या लग्न सराईत चांगले पैसे मिळतील, या हेतूने आपल्या पथकात काही सुधारणा करण्याचे ठरवले. त्यांनी नवीन साऊंड सिस्टीम खरेदी केली. आपले बँड पथक अद्ययावत केले. त्यानंतर लग्न समारंभातील सुपाऱ्या येण्याची वाट पाहू लागले. मात्र, त्यातच कोरोनाचे संकट धडकले आणि त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले.
ही व्यथा फक्त या सुभाष निकाळजे यांच्या एका बँड पथकाची नाही. तर बुलडाणा जिल्ह्यात असे 100 हून अधिक बँड पथक आहेत. त्यांची अवस्था देखील अशीच झालेली आहे. या अशा बँड पथकात काम करणारे जवळपास 18 हजाराच्या जवळपास कलाकार जिल्ह्यात आहेत. दीपावली ते जून महिन्यापर्यंत या कामांवर आणि त्यातील पैशावर ते आपला उदरनिर्वाह करतात. तसेच कुटुंबाची गुजराण करतात.
सध्या शासनाने 50 लोकांना लग्न समारंभात उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे. यापैकी बँड पथकातील पाच ते सात लोकांना जरी परवानगी मिळाली, तरी या कलाकारांना चार पैसे मिळतील. अन्यथा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.