बुलडाणा -मागील काही दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. एका अंड्याच्या भावात अख्खी कोंबडीची किंमत मिळत असतानासुद्धा कोंबडी खरेदी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोंबड्या सोडून आपला रोष व्यक्त केला आहे.
पोल्ट्रीधारकांच्या अनुदानासाठी स्वाभिमानीने सोडल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर कोंबड्या हेही वाचा -कोरोना व्हायरस: नागपुरातील 'त्या' व्यक्तीच्या दोन नातेवाईकांनाही लागण
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. एखादी आपत्ती येते त्यावेळी बाधितांना सरकारद्वारे मदत केली जाते. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसायिकांवरही कोरोना विषाणूची आपत्ती आली असून, सरकारने पंचनामे करून त्यांना आर्थिक अनुदान देण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे. अशा प्रकारचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
तुपकर यांनी ट्वीटरद्वारेही थेट मुख्यमंत्र्यांकडे कुक्कुटपालन व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. व्यवसायिकांना सरकारने मदत न केल्यास राज्यभर कोंबड्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोडू असा इशाराही तुपकर यांनी दिला होता.