बुलडाणा -जगभरात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला आहे.
याबाबत अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 13 मार्चला बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत सामाजिक माध्यमांमधून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक यांच्याबाबत संबंधित पोलीस ठाणे प्रभारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी माहिती द्यावी. आरोग्य विभागाने कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणावर जन-जागृती करावी. जनजागृतीपर साहित्य प्रकाशित करून वितरीत करावे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. औषध विक्रेत्यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा -कोरोना व्हायरस: सुट्टी जाहीर नाही... 'ते' परिपत्रक खोटे!
कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच लग्न, धार्मिक कार्यक्रम यामध्येसुद्धा कर्मी गर्दी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी स्वत:हून धार्मिक कार्य, लग्न समारंभ टाळावेत. याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापकांना सुचना देण्यात येत आहेत. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावे, आपला स्वच्छ रूमाल वापरावा. रूमाल ताबडतोब स्वच्छ करावा. गर्दीमध्ये जाणे टाळावे, असे आवाहनही यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये होऊ शकते कारवाई-
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील 2005 कलम 34 नुसार जर एखाद्या व्यक्तीमुळे एखादी कुठली आपत्ती ओढावणार आहे, असे लक्षात आले, तर अशा व्यक्तीच्या हालचालींवर प्रतिबंध करता येतो. या कायद्याच्या अनुषंगाने आदेश काढले असल्यास व त्याचे पालन न केल्यास एका वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.
अफवांवर विश्वास ठेवू नये-
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात अर्धवट माहिती असलेले, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. असे कोणतेही संदेश कुणीही अधिकृत स्त्रोतांकडून खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करावे. चुकीचे मेसेज पाठवू नये. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश प्राप्त झालेले आहे. तरी कुणीही कोरोना विषाणू संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये. हेल्पलाईन क्रमांक : राष्ट्रीय कॉल सेंटर 911123978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020 26127394 व टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा.