बुलडाणा - एमआयडीसीमधील हमालांना दर २ वर्षानंतर हमालीच्या दरामध्ये २० टक्क्यांनी वाढ होण्याचा करार होता. असे असताना २ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी उलटल्यानंतरही व्यापारी वर्गांनी हमालीचे दर वाढवले नाही. यामुळे खामगाव शहरातील एमआयडीसीमधील हमालांनी बुधवारपासून काम काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत दर वाढविला जात नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा हमाल संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसीच्या ऑईल मिलमध्ये काम करणाऱ्या हमालांना वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. सध्या जी हमाली मिळते त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षणाचा खर्च भागत नाही. त्यामुळे, हमालीच्या दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी पाठपुरावा करूनही 'दि सीड्स अँड केक्स मिलर्स असोसिएशन'कडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने बुधवारपासून 'जय गजानन हमाल संघटने'कडून काम बंद आंदोलन करण्यात आले.