भंडारा- महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोली आहेत. या प्रत्येक बोलीचा एक वेगळा गोडवा आहे. यापैकीच पूर्व विदर्भातील झाडी बोली आहे. ही भाषा 1 हजार 300 वर्षांपूर्वीची म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. या झाडी बोलीचे मागील 40 वर्षांपासून संवर्धन आणि संगोपन करण्याचे काम लाखनी तालुक्यातील डॉ. हरिश्चंद्र बोरकर करीत आहेत.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील काही ग्रामीण भागात ही झाडीबोली मोठया प्रमाणात बोलली जाते. जवळपास दीड कोटी लोक झाडीबोली बोलत आहेत. सुरवातीच्या काळात या भाषेला नावही नव्हते. मराठी भाषेचे अभ्यासक असलेले डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी 40 वर्षांपूर्वी या भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर 1991 मध्ये झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना केली.
असे मिळाले भाषेला नाव -
या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. बऱ्याच गावांची नावे ही झाडांच्या नावावर आधारित आहेत. त्यामुळे ही झाडी प्रदेशातील बोली म्हणून झाडी बोली या नावाने ओळखली जाते. झाडी बोलीची आजपर्यंत 27 संमेलने झाली आहेत. चक्रधर स्वामी यांनी लिहिलेल्या लीळाचरित्र आणि मुकुंदराजांनी लिहिलेले विवेकसिंधु ग्रंथात बरेच शब्द झाडीबोलीचे आढळतात, असे बोरकर यांनी सांगितले.
झाडी बोलीचे हे आहेत 'चालते-बोलते विद्यापीठ' हेही वाचा-आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षिततेमधील त्रुटी शोधा; मिळवा १ लाख रुपये!
असे झाले भाषेचे संवर्धन-
झाडीबोली या दुर्मीळ भाषेला ओळख मिळाली आहे. ही भाषा वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चळवळ सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व बोलींना भाषा म्हणावे, अशी मागणी होत आहे. मराठी भाषा काही वर्षांनंतर लोप पावणार आहे, असे बोलले जात होते. मात्र मराठी भाषा ही कधीही मरणार नाही. तिला जिवंत ठेवण्याचे काम पुणे, मुंबईकडील लोक नाही तर, ग्रामीण भागातील कामगार, शेतकरी, मजूर करतील, असा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला.
बोरकरांची साहित्यसंपदा-
बोरकर यांनी आतापर्यंत 106 पुस्तके लिहिली आहेत. यामधील अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तके ही झाडीबोलीत आहेत. उर्वरित पुस्तके ही झाडीबोलीसंदर्भातील आहेत.. त्यांनी 2002मध्ये 'झाडी मराठी शब्दकोश' लिहिला आहे. या शब्दकोशात प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा संदर्भ आणि त्याचा कुठे वापर झाल्याची माहिती दिली आहे. भारताच्या 24 भाषांत त्याचा कुठे वापर झाला, या सर्वांची इत्यंभूत माहिती या शब्दकोशात आहे. झाडीबोलीचा पुस्तकांचा संग्रह वाढला आहे. वेगवेगळ्या लेखकांनी जवळपास 250 पुस्तके लिहिली आहेत.
हेही वाचा-दिलासादायक! ट्रॅक्टर तयार करणाऱ्या 'या' कंपनीकडून व्हेटिंलेटर विकसित
राज्य सरकारने घेतली कामाची दखल
हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोली वाचविण्यासाठी त्याचे संवर्धन आणि संगोपन अभ्यास आणि चळवळ सुरू केली. याची दखल घेत राज्य सरकारने 2002, 2005मध्ये भाषिक भ्रमंती या त्यांच्या 24 पानांच्या एकांकीकेला पुरस्कार दिला. याशिवाय दंडारी या पुस्तकाला राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे.
गतवर्षी भाषा संवर्धनाचाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांची नऊ पुस्तके विद्यापीठात आहेत. झाडीबोलीमधील सर्वात प्रसिद्ध लोककला म्हणजे दंडार, खडी गंमत आहे. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी बोरकर यांचे मोलाचे योगदान आहे.
हेही वाचा-गुगलची कार्यालये 'या' दिवशीपासून होणार सुरू; कर्मचाऱ्यांना अतिरिक्त हजार डॉलर
हे आहे इंग्रजीवर बोरकरांचे मत
झाडीबोली, कोकणी असो किंवा खानदेशी असो या सर्व बोलीभाषांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तरीही सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारने सर्वात पहिले इंग्रजी आणि संस्कृतचा अट्टहास सोडायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हरिश्चंद्र बोरकर हे झाडीबोली भाषेचे एक विद्यापीठ आहे. ते 75 वर्षांचे झाले आहेत. तरीही झाडीबोलीवरील प्रेम अजूनही कायम आहे. नुकतेच, त्यांनी कोरोना विषयावर पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. त्यांच्या या झाडीबोलीच्या चळवळीत तरुण मंडळी सहभागी होत आहे. त्यांच्या साहित्यावर एकाने पीएचडी केली आहे. तर दोन जण पीएचडी करीत आहेत. त्यांनी पेटविलेला झाडीबोलीचा दिवा निरंतर प्रकाश देत राहील, एवढे निश्चित.