बुलडाणा - केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्यभरातून एक कोटी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून केंद्र सरकारला हे निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी आज गुरुवारी 29 सप्टेंबरला पत्रकार परिषदेतून दिली.
शेतकरी विधेयकाच्या विरोधात गांधी जयंती दिनी काँग्रेस करणार निदर्शने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बुलडाणा संपर्क कार्यालयात आज मंगळवारी 29 सप्टेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राहुल बोंद्रे बोलत होते. यावेळी राजीव गांधी पंचायत संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर, बुलडाणा पंचायत समिती सभापती सौ उषाताई चाटे, मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अशोकराव पडघान, अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष जावेद कुरेशी, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रिजवान सौदागर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, बुलडाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांची उपस्थिती होती.केंद्र सरकारने मंजूर केलेले विधेयक शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या विधेयकामुळे हमीभावाचे संरक्षण मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष नाराजी आहे. नव्या कायद्यामुळे खासगी व्यापाऱ्यांचे भले होणार आहेत. त्यामुळे शेतमाल कवडीमोल भावाने घेतला जाईल. बळीराजाला भांडवलदारांच्या स्वाधीन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे सांगत केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात 28 सप्टेंबरला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल यांना निवेदन सादर केले आहे. तसेच आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात २ ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय, विधानसभा मतदार संघात धरणे आंदोलन केले जाणार आहे. कृषी विधेयकाबरोबरच केंद्र सरकारने कामगार कायद्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. या बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या कामगार कायद्यामुळे त्यांना अनेक हक्क प्राप्त झाले होते. कंत्राटी कामगार कायम होत होता, पण आता नव्या कायद्यामुळे कायम कामगारही कंत्राटी होणार असून कामगारांना मालकांचे गुलाम बनवणारा हा कायदा आहे. म्हणून शेतकरी व कामगार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी २ ऑक्टोबरला ‘किसान मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे. आंदोनलाच्या पुढच्या टप्प्यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एका भव्य व्हर्च्युअल किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहिम राबविली जाणार आहे. या काळ्या कायद्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जगजागृती करत ही मोहिम राबवली जाणार आहे. शेतकरी व कामगार यांना देशोधडीला लावणाऱ्या या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहील, असे राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे.