बुलडाणा - दसरा म्हणजेच आनंद आणि मांगल्याचा सण. वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी असेही म्हणतात. महाराष्ट्रासह देशभरात मंगळवारी दसरा उत्साहात साजरा केला गेला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात ५० फूट उंच बांबूच्या माध्यमाने रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला अग्नी देण्यात आली. यावेळी १ तास चाललेल्या फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेले होते. तर, दुसरीकडे दसऱ्याच्या निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूराचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. या दिवशी रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. या सणानिमित्त जिल्ह्यातील खामगावात बांबूने तयार केलेल्या ५० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर, दसऱ्याच्या निमिताने एकमेकांना शुभेच्छा देत लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.