बुलडाणा - बनावट सोन्याचे नाणे खरे असल्याचे भासवून, कमी किंमतीमध्ये विक्रीचे आमिष दाखवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीला गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची चौकशी सुरू असताना पोलिसांना आणखी काही धागे-दोरे हाती लागले. त्यााधारे आज पहाटे खांमगाव तालुक्यातील जंगल परीसरात पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात दोन अट्टल गुन्हेगार पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्न्या, मोबाईल, आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. २० अधिकारी, आरसीबीचे दोन पथके, आणि ५० अंमलदार मिळून ही कारवाई करण्यात आली.
खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे बनावट सोन्याच्या नाण्यांना खरे भासवून लुटणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीने आतापर्यंत राज्यातील अनेक जणांची फसवणूक केली आहे. कमी किंमतीत सोन्याच्या नाण्यांचे आमिष दाखवायचे, सौदा ठरल्यावर संबंधित व्यक्तीला अंत्रज शिवारात बोलवायचे, त्याला मारहाण करून त्याने सोबत आणलेला पैसा लुटायचा अशी आरोपीची कार्यपद्धती होती. 5 मे रोजी अशाच पद्धतीने आरोपींनी दोघांना लुटले होते. याप्रकरणाचा शोध सुरु असताना पोलिसांनी या टोळीतील 15 जणांना अटक केली होती, त्यांच्याकडून दोन देशी कट्टे व इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.