बुलडाणा -जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर अगोदरच प्रचंड ताण आहे. आणि आता त्यात भरीसभर म्हणून मलकापूरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात त्यांनी 1 मेला सामूहिक राजीनामे देखील दिले होते. मात्र आमदार राजेश इकडे यांनी मनधरणी केल्यानंतर हे राजीनामे माघारी घेण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावरून नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते, या आरोपानंतर डॉक्टरांनी सामुहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालयांमधील रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, आणि त्याचवेळी रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून निर्माण करण्यात येत असलेला दबाव यामुळे डॉक्टर जेरीस आले आहेत. केवळ डॉक्टरच नव्हे, तर कर्मचाऱ्यांनाही सतत तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोविडच्या रुग्णांना हाताळत असतांना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीतून आरोग्य कर्मचारी जात असताना, स्थानिक पुढाऱ्यांकडून दबाव निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करत, मलकापूरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले राजीनामे वैद्यकीय अधीक्षकांकडे सादर केले होते, मात्र वैद्याकीय अधीक्षकांनी याची माहिती मलकापूरचे आमदार राजेश एकडे, तहसीसदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली. राजीनाम्याची माहिती मिळताच आमदार एकडे यांनी कोविड रुग्णालय गाठून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली, व त्यांना राजीनामे परत घेण्याची विनंती केली. त्यानंतर या वैद्याकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे परत घेतले.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप
मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये शुक्रवारी 30 एप्रिल रोजी रात्री दिड ते पावणे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान व्हेंटिलेटर वर असलेला एक रुग्ण दगावला. तर रुग्णालयातील इतर रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत होते. या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी कोविड केंद्राला भेट देवून, कोविड केंद्रातील विद्युत नसल्याने जरनेटर आहे किंवा नाही, याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली होती, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.